पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता : चंद्रकांत पाटील




आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० किंवा २२ डिसेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पिंपळेसौदागर येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रक्रिया, उमेदवारी अर्ज आणि पक्षांतर्गत समन्वय याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

पाटील म्हणाले की, उमेदवारी अर्जांची वाटप प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून पुढील चार दिवस अर्ज स्वीकारले जातील. इच्छुकांनी कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता मोरवाडीतील पक्ष कार्यालयात स्वतः येऊन अर्ज दाखल करावेत. अर्जांची प्राथमिक छाननी करून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत.

यावेळी उमेदवार निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एका खासगी संस्थेमार्फत सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व्हेचे निष्कर्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत यांचा एकत्रित आधार घेऊन प्रत्येक प्रभागातील उमेदवार ठरवला जाणार आहे. सुमारे ९० टक्के ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे मत आणि सर्व्हेचे निष्कर्ष जुळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

युतीबाबत बोलताना पाटील यांनी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य देणे गरजेचे असल्याचे नमूद केले. युती झाली नाही, तरी मित्रपक्षांवर टीका न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले निर्देश त्यांनी स्मरण करून दिले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने